ऐतिहासिक वैशिष्ट्ये : बागलाण तालुक्याला पुरातन काळापासून ऐतिहासिक महत्त्व आहे. बागलाण तालुक्यात इ.स. १३०० ते १७०० या कालखंडात बागुल घराण्यातील राजे राज्य करीत होते. त्यांच्या नावावरून या प्रदेशाला बागलाण हे नांव पडले. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेची लूट करून या तालुक्यात परतीला निघाले होते. त्यावेळी साल्हेर मुल्हेरची लढाई झाली. या लढाईचा “Rise of the Maratha Power” या पुस्तकात रानडेंनी उल्लेख केला आहे. बागलाण संतांची भूमी आहे. वैकुंठवासी यशवंतराव महाराजांनी भीषण दुष्काळात दामाजी पंतासारखी भूमिका बजावून भूकेलेल्यांना अन्न दिले, जनावरांचे प्राण वाचविले. त्यांनी देवमामलेदार म्हणून नांव भूषविले.
सामाजिक वैशिष्ट्ये : बागलाण तालुक्यातील समाज १७१ गावांमध्ये विखूरला आहे. सामाजिक रचनेनुसार ६६ गावातील आदिवासी समाजामुळे आदिवासी गावे १०५ गावात बिगर आदिवासी समाज असे दोन विभाग पडले आहेत. बागलाणची प्रमुख बोलीभाषा अहिराणी आहे. आदिवासी भागात आदिवासी, कोकणी, भिल्ल इ. पोटभाषा आहेत. बागलाण तालुक्यात प्रामुख्याने शेती हा मुख्य व्यवसाय आहे तसेच पशुपालन, कुक्कुट पालन, घोंगड्या विणने, फडक्या रंगविणे हेव्यवसाय परंपरागत आहेत. बागलाणचे प्रमुख स्वातंत्र्य सैनिक नरहर गोपाळ शेठ व त्यांचे सहकारीयांनी सामाजिक परंपरा जिवंत ठेवल्या आहेत.
बागलाण तालुक्यात ठेंगोडा येथे सूतगिरणी, शेवरे येथे साखर कारखाना कार्यरत आहेत. बागलाण तालुक्यात हिंदू, मुसलमान, जैन इ. मुख्य धर्मातील लोक गुण्या गोविंदाने एकत्र वास्तव्य करतात. सामाजिक परंपरेनुसार सण व उत्सव साजरे केले जातात. त्यात सटाणा येथे देवमामलेदार, मुल्हेर येथे “रासक्रिडा” हे उत्सव होतात.
बागलाण–सटाणा तालुका : भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक माहिती :
भौगोलिक वैशिष्ट्ये : बागलाण (सटाणा) तालुक्याचे क्षेत्रफळ १६१४.५ चौ.की.मी. असून बागलाणच्या पश्चिमेकडील भाग डोंगराळ आहे. सह्याद्री पर्वताच्या रांगा पसरलेल्या असून साल्हेरचा किल्ला, मुल्हेरचा किल्ला, तिळवण किल्ला, मांगीतुंगीचे डोंगर, असा विस्तृत डोंगराळ परिसर आहे. बागलाण तालुक्यातून आरम व मोसम ह्या प्रमुख नद्या वाहतात. आरम नदीवर, केळझर येथे धरण बांधलेले असून त्याचा बागायती शेतीसाठी उपयोग होतो. मोसम नदीवर हरणबारी येथे धरणबांधलेले असून त्याचा डावा व उजवा कालवा काढलेला आहे. त्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग होतो. बागलाणच्या पश्चिमेकडील भाग डोंगराळ असल्यामुळे तेथे आदिवासी लोक राहतात. त्याभागात वाड्यापाडे नव्वदच्या आसपास असल्याने वस्ती शाळा हा उपक्रम फायद्याचा ठरतो. बागलाणच्या पूर्वेकडील भाग सखल व सुपीक जमिनीचा आहे. या भागात ऊस व कांदा हीबारमाही पिके घेतली जातात. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष व डाळींब बागा विकसितकेल्या आहेत. तसेच बाजरी, भुईमूग, मका, कपाशी, गहू व हरबरा इ. पिके घेतली जातात.
सांस्कृतिक वैशिष्ट्ये :हा तालुका सांस्कृतिक परंपरे बाबत नाशिक जिल्ह्यात प्रसिध्द आहे. भारतात मथुरेनंतर कोजागिरी पौर्णिमेस होणारी रासक्रिडा व आदिवासी नृत्य मुल्हेर येथे होते. श्रीक्षेत्र दोधेश्वर, भिमाशंकर, या ठिकाणी शिवलिंग आहे तसेच देवळा ते अलियाबाद या ठिकाणी हेमाडपंथी देवालय असून त्याचे कोरीव काम अप्रतिम आहे. बागलाण तालुक्यात शैक्षणिक सुविधा जि.प. प्राथमिक शाळा, उर्दु शाळा, खाजगी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, पोस्टबेसिक आश्रम शाळा, महाविद्यालये, कला विद्यालये, इंग्रजी माध्यम शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यात सर्वधर्माचे लोकशिक्षण घेतात. शालेय कार्यक्रमात सर्व धर्मातील सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी यात सर्व विद्यार्थी सहभागी होतात.
देव मामलेदार : देव मामलेदार तथा यशवंत महादेव भोसेकर (१३ सप्टेंबर, १८१५ : भोसे, पंढरपूर – २७ डिसेंबर, १८८७ : नाशिक) हे एक हिंदू संत होते. इ.स. १८२९ ते इ.स. १८७२ अशी ४३ वर्षे ते महसूल खात्यात नोकरी करत होते. खात्यात बढती मिळाल्यानंतर त्यांनी येवला, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, शहादा, धुळे, शिंदखेडा व शेवटी सटाणा येथे मामलेदार म्हणून काम पाहिले. सटाणा येथूनच ते निवृत्त झाले.
साल्हेर किल्ला : छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना धूळ चारली आणि सह्याद्रीचा सर्वात उंच साल्हेर जिंकला ! साल्हेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
मुल्हेरचा किल्ला :मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वत रंगांमध्ये किल्ल्याची अंदाजे समुद्रसपाटी पासून उंची ४२९० फूट आहे. मुल्हेरला जोडूनच मोरागड असून तो मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात.
मांगी – तुंगी किल्ला :मांगी-तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. येथे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, नुकतीच येथे जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे.
पिसोळ :पिसोळ नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात आहे.