‘सुपर ५०’ उपक्रम – क्लासरूमकडून करियरकडे
जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून २०२२ मध्ये सुपर ५० उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांची निवड निवड परीक्षेद्वारे करण्यात येते. या विद्यार्थ्यांना जेईई, सीईटी आणि जेईई अॅडव्हान्स परीक्षांसाठी निवासी स्वरूपात विशेष प्रशिक्षण दिले जाते. तसेच, निवास व भोजन व्यवस्थेसह नियमित आरोग्य तपासणीची सोय देखील केली जाते.
सन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेत २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यापैकी ७ विद्यार्थ्यांनी ९ जून रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग सुकर झाला.
सन २०२३ मध्ये या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात आली. ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसह इतर मागास, दिव्यांग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांची देखील निवड करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या ११० वरून २२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे यश मिळवणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्यात आपल्या गावाचा अभिमान ठरेल, यात शंका नाही.
उपक्रमाची वैशिष्ट्ये:
✔ इयत्ता ११ वीतील विज्ञान शाखेतील अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना निवासी स्वरूपात सीईटी, जेईई परीक्षेसाठी प्रशिक्षण दिले जाते.
✔ २०२३ मध्ये व्याप्ती वाढवून इतर मागास, दिव्यांग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थी समाविष्ट करण्यात आले.
✔ विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे केली जाते.
✔ सर्व विषयांसाठी तज्ज्ञ शिक्षक व प्रशिक्षक उपलब्ध.
✔ विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन आणि आरोग्य तपासणीची सुविधा.
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया:
“घरची परिस्थिती बेताची असल्याने जेईई परीक्षेसाठी क्लास लावणे शक्य नव्हते. सुपर ५० उपक्रमामुळे निवासी प्रशिक्षण मिळाले. हा उपक्रम माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी ठरला.”
— कु. अश्विनी सुभाष बोरसे, JEE Advance Rank (SC) – 968
“सुपर ५० उपक्रमामुळे जेईई आणि जेईई अॅडव्हान्सबद्दल माहिती मिळाली. आता आयआयटीमध्ये शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण करणार.”
— कु. हर्षदा संजय वाटाणे, JEE Advance Rank (ST) – 2263
- कु. अश्विनी सुभाष बोरसे
- कु. हर्षदा संजय वाटाणे