• छापा
 • नाशिक जिल्ह्याविषयी

  Map Button

  Nashik Map

  सहयाद्री पर्वताच्या कुशीतील गोदावरी नदीच्या तीरावर नाशिक हे शहर वसलेले आहे. नाशिक हे शहर पुराणकाळापासून प्रसिध्द व पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते.पौराणिक काळातील चौदा वर्षाच्या राम लक्ष्मण यांचे वनवास काळात नाशिक जवळील जंगलात लक्ष्मणाने शूर्पनखा नावाच्या राक्षसणीचे नाक कापले होते. संस्कृ त भाषेत नाकाला नासिका म्हणतात, म्हणून या भागाचे / जिल्हयाचे नाव नाशिक असे पडले आहे. नाशिक जिल्हा महाराष्ट्रच्या उत्तरभागी १९.३३ आणि २०.५३ या उत्तर अक्षांश व ७३.१६ आणि ७५.१६ या पूर्व रेखांश या भौगोलिक पटृयात वसलेला आहे. जिल्हयातील सर्व नद्या सहयाद्रीपर्वतात उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. वरील दोन तालुके वगळतात उर्वरित जिल्हयाच्या मध्यातून पूर्व-पश्चिम अशी रेषा गृहीत धरल्यास जिल्हयाचे दोन भाग होतात.या रेषेच्या उत्तरेकडील भागातील पावसाचे पाणी गिरणा व तिच्या उपनद्यांद्वारे सरते शेवटी तापी नदीत वाहून जाते. तर रेषेच्या दक्षिणेकडील भूभाग गोदावरीचे खो-यात वसलेला आहे. जिल्हयातील नद्यांचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे जिल्हयातील सर्व नद्या जिल्हयातच उगम पावतात. एकही जल प्रवाह जिल्हा बाहेरून नाशिक जिल्हयात येत नाही. पेठ आणि सुरगाणा या तालुक्यातील जलप्रवाहाव्यतीरीक्त इतर सर्व जलप्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. जिल्हयाच्या पश्चिम सिमेवर सहयाद्री पर्वतमाला आहे. तसेच जिल्हयात अनेक डोंगर आहेत. जिल्हयातील बहुतेक सर्व डोंगर पश्चिमेकडील सहयाद्री पर्वताचे पूर्वेकडे पसरलेले फाटे आहेत.

  महाराष्ट्रतील सर्व विविधता नाशिक जिल्हयात दिसून येतात. सुरगाणा आणि पेठ या तालुक्यातील पावसाचे प्रमाण, हवामान, पिके हे कोकणातील सर्व बाबींशी समरूप आहेत.या तालुक्यातील वनात उत्कृष्ट प्रतिचा साग व इतर वनउपज मोठया प्रमाणात मिळतात. याच डोंगराळ भागात मोठया प्रमाणात आदीवासी राहतात. जिल्हयाच्या मध्य व पूर्व भागात पश्चिम महाराष्ट्रसारखी भाजीपाला, फळे आणि मोठया प्रमाणात उस पिकतो. या भागात साखर कारखाने आहेत. या भागात ओलीता खालील क्षेत्र मुबलक असल्यामुळे दुधाकरीता आवश्यक असलेल्या हिरव्या चा-याची पिके मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे दुधाचे उत्पादन भरपूर होते. जिल्हयात उत्पादन होणारा भाजीपाला मोठया प्रमाणात मुंबईला पुरविला जातो म्हणून नाशिक जिल्हयास मुंबईची परसबाग व गवळीवाडा असेही म्हणतात. पुणे, मुंबई प्रमाणेच नाशिक जिल्हयाचे झपाटयाने औद्योगिकरण होत आहे. जिल्हयाच्या पूर्व भागात हवामान उष्ण असल्यामुळे येथे विदर्भ-मराठवाडा प्रमाणे कापूस व ज्वारीचे उत्पादन सुध्दा होते.

  नाशिक जिल्हयाचे क्षेत्रफळ १५.५३० चौ.की.मी.आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी ५.०४ क्षेत्र व्यापलेल्या या जिल्हयाचा, राज्याचा एकू ण क्षेत्रफळाचा विचार करता पाचवा क्रमांक आहे. २००१ च्या जनगनणेनुसार राज्याच्या ५.१५ प्रतिशत असलेल्या ४९.८७ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्हयाचा लोकसंख्ये बाबत राज्यात चौथा क्रमांक आहे. राज्याचा दर चौरस किमी ला ३१४ लोकसंख्या घनतेच्या तुलनेत जिल्हयाच्या दर चौ.कि.मी. ला लोकसंख्या घनता ३२१ इतकी आहे. जिल्हयातील एकूण १,९३१ खेडी १५ तालुक्यातील सामुहिक विकास गटात सामावलेली आहे. जिल्हयात दोन महानगर पालिका, एक कटक मंडळ व आठ नगर परिषदा आहे.

  नाशिक जिल्हयाचे हवामान सर्वसाधारण विषम स्वरूपाचे असून, वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२९१- ०० मि.मि.आहे. जिल्हयातील जमिन काळी,माळ, कोरड व बरड चार प्रकारात विभागलेली आहे.

  जिल्हयातील २००१च्या एकूण लोकसंख्येपैकी ६१.१६ टक्के व्यक्ति ग्रामिण भागात रहातात. एकूण लोकसंख्येच्या २४.१८ टक्के अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या असलेला हा जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. एकूण लोकसंख्येशी साक्षरतेचे प्रमाण ७४.१५ टक्के आहे. सन २००१ या वर्षात जिल्हयात ८,६४,६६१ हेक्टर जमीन लागवडीखाली आणण्यात आली. ती जिल्हयाच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५५.३० प्रतिशत एकूण होती. ८,६४,६६१ हेक्टर पिकाखालील क्षेत्रापैंकी ९३.५१ प्रतिशत जमीन ही निव्वळ पिकाखालील क्षेत्र असून दूबार पिक हे निव्वळ पिकाखालील क्षेत्राच्या ६.४८ प्रतिशत होते. एकंदर पिकाखालील क्षेत्रापैकी ७,४२,९०० हेक्टर जमीन ही खाद्य पिकाखालील होती. ती एकूण पिकाखालील क्षेत्राच्या ८५.९१ प्रतिशत होती. अखादय पिकाखालील १,२१,७६१ हेक्टर क्षेत्र एकूण पिकाखालील क्षेत्राच्या १४.०८ प्रतिशत होते. नाशिक जिल्हयात एकलहरे येथे औष्णिक विद्युत प्रकल्प असून त्यातून उत्पादीत वीज महाराष्ट्रत तसेच इतर राज्यांना पुरविली जाते. सन २००१ च्या जनगणनेप्रमाणे जिल्हयातील एकूण १,९३१ खेडयांपैकी (ओसाड गावे सोडून) सर्व खेडयांचे व जिल्हयातील सर्व १७ नागरी भागाचे विद्यूतीकरण झालेले आहे. जिल्हयातून मुंबई- धुळे आग्रा व पुणे- नाशिक हे दोन राष्ट्रीय महामार्ग जात असून, या दोन मार्गामुळे नाशिक शहर निरनिराळया राज्यातील शहरांशी जोडले गेले आहे. जिल्हयात असलेल्या राज्य महामार्गामुळे जिल्हयातील महत्वाची शहरे व तालुक्याची ठिकाणे जोडली गेली आहे.

  जिल्हयात २८७ कि.मी. लोहमार्गाचे जाळे असून जिल्यातील इगतपूरी, नाशिक, निफाड, नांदगाव व येवला या तालुक्यातून लोहमार्ग गेलेला आहे. या लोहमार्गावर जिल्हयातील मनमाड हे रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे. तेथून दक्षिण भारतात जाणारा रेल्वेचा मार्ग गेलेला आहे. जिल्हयात जिल्हा परिषदेद्वारे आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. जिल्हा परिषदेची १०३ प्राथमिक आरोग्यकेंदा्रे व ५३० उपकेंद्रे, आयुर्वेदिक दवाखाने ११, ग्रामिण रूग्णालय २४, कुटीर रूग्णालय १ कार्यरत आहे.

  जिल्हयातील शैक्षणिक सेवा / सुविधा उपलब्ध असून १९९९-२००० अखेर प्राथमिक शाळा ३,३२९ तर माध्यमिक शाळा व उच्चमाध्यमिक ७७६ होत्या. सर्व शाळा व विद्यालयातून १९९९-२००० अखेर १०,६९,८८० विद्यार्थि शिक्षण घेत होते.

  जिल्हा इतिहास

  नाशिक प्रदेशाच्या अस्तित्वाचा उल्लेख पुरातन काळातील पाषाण युगापर्यंत जातो. तसेच पौराणिक उल्लेखानुसार थेट रामायण काळाशी संबंध येतो. प्रभु रामचंद्रांचे मुख्यत्वे वनवासातील बारा वर्षांचे पुनित वास्तव्य नाशिक परिसरात गोदावरीच्या काठी पंचवटीत होते. जिल्हयाचे मुख्यालय असलेले नाशिक शहर हे प्राचिन काळापासून तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. जिल्हयातील श्री क्षेत्र त्रंबकेश्वर आणि सप्तशृंगीगड ही तर भाविकांची श्रध्दा स्थाने आहे.

  सध्याचा नाशिक जिल्हयाचा बहुतांश भाग इ.स.१३१३ ते १३४७ या काळात देवगिरीच्या यादवांच्या अधिपत्याखाली व त्यानंतर १४९० पर्यंत बहामणी राज्याचा एक भाग होता. इ.स. १४९० ते १६३६ या काळात तो अहमदनगरच्या निजामशाहीत समाविष्ट झाला होता. छत्रपती श्री.शिवाजी महाराजांनी मुस्लिम सत्तेच्या जोखाडातुन हा भाग मुक्त केला पेशवाईच्या अस्ता नंतर इ.स.१८१८ पासून हा सर्व भूभाग ब्रिटिशांचे अधिपत्याखाली गेला. मध्य युगात प्रशासकीय दृष्टया नाशिक जिल्हयाचा काही भाग अहमदनगर व काही भाग खांदेश जिल्यात होता. १८६९ मध्ये नाशिक हा स्वतंत्र जिल्हा करण्यात आला. तेव्हा पासून १३ तालुके असलेल्या या जिल्यात दि. २६.६.९९ पासून देवळा व त्रंबक या नविन तालुक्यांची निर्मिती होउन एकुण १५ तालुके अस्तित्वात आले आहेत.

  पौराणिक व ऐतिहासिक सांस्कृतिक पंपरेची संपन्नता लाभलेला नाशिक जिल्हा आता औद्योगिक क्षेत्रातही विकासाकडे वाटचाल करीत आहे. नाशिक जिल्हा ऐतिहासिक व धार्मिक स्थळांकरिता प्रसिध आहे. नाशिक पासून २८ कि.मी. अंतरावर १२ ज्योतिलिगापैकी एक ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्रंबकेश्वर आहे. नाशिक पासून ७२ कि.मी. अंतरावर वणी येथे सप्तशृंगी देवीचे प्राचिन मंदीर असून तेथे दरवर्षी संपूर्ण देशातून हजारो भाविक यात्रेच्या निमित्ताने भेट देत असतात. जिल्हा परिषदे तर्फे नांदूरी येथे नवरात्र उत्सवाचे दरम्यान वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक येथे पंचवटी हे पवित्र धार्मिक स्थान असून जवळच भक्तीधाम व नाशिक रोड येथे मुक्तीधाम ही अत्याधुनिक साधनांनी तयार कलेली मंदीरे आहेत. नाशिक येथे दर १२ वर्षांनी सिहस्थ परवणी काळात कुंभमेळा भरतो त्या करिता भारतातून लाखोंच्या संख्येने भाविक लोक नाशिकला येतात.

  नाशिक शहराला पाणिपुरवठा करणारे नाशिक पासून १३ कि.मी. अंतरावर असलेले मोठया प्रकल्पांतर्गत गंगापूर हे मातिचे धरण आहे. नाशिक पासून २० कि.मी. अंतरावर असलेला भारत सरकार, संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील मीग विमानांचा ओझर येथील कारखाना प्रसिध्द आहे. संरक्षण मंत्रालयाचे सैनिक-तोफखाना केंद्र देवळाली येथे आहे. तसेच भारत सरकारचा भारत प्रतिभूती मुद्रनालय, नाशिकरोड येथे आहे. मेरी या नावाने प्रसिध्द असलेली महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक येथे आहे. एकलहरे येथे विज निर्मितीचे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक पासून १५ कि.मी अंतरावर आहे.

  नाशिक जिल्हयाला तशी प्रारंभीपासूनच धार्मिक तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. प्रभु रामचंद्राच्या पदपर्शाने पावित झालेला, पवित्र गोदावरीचे उगमस्थान असलेला, संप्तशृंगीगड, त्र्यंबकेश्वर सारख्या धार्मिक स्थळांनी प्रसिध्द असलेला आणि कुंभमेळयामुळे जगात ओळख असलेल्या नाशिक जिल्हयाला ऐतिहासिक, धार्मिक पाश्र्वभूमी लाभलेली आहे. धार्मिक स्थळांमुळे प्रसिधद असलेल्या या जिल्हयाने औद्योगिकीकरणातही गरुडभरारी घेवून मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाशिक जिल्हयात १५ तालुके असून त्यातील ८ आदिवासी तालुके आहेत. अन्य तालुक्यातही आदिवासी समाजाची संख्या ब-यापैकी आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबक सारख्या आदिवासी तालुक्यांमध्ये डोंगर आणि दर्यां चाच मोठा भाग असल्याने या तालुक्यात अद्यापही दळणवळण यंत्रणा सर्वदूर पोहचलेली नाही. मालेगाव हा तालुका मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसर, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्याचा काही भाग हे कमी पावसाचे तर त्र्यंबक, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण जास्त पर्जन्याचे क्षेत्र आहे. जिल्हात २२ धरण असून नाशिक तालुक्यातील गंगापूर हे मातीचे धरण म्हणून प्रसिध्द आहे.

  नाशिक जिल्हयात सांस्कृतिक चेहराही लाभला आहे. प्रत्येक तालुक्याला वेगळे अशी सांस्कृतिक ओळख आहे. आदिवासी समाजाचे कोकणी नृत्य, लोकगीत, डोंगर्याेदेव उत्सव प्रसिध्द आहे. विविध गावातील, समाजातील उत्सव, यात्रा, सण-समारंभ भिन्न असल्याने प्रत्येकाला एक वेगळा सांस्कृतिक व सामाजिक चेहरा प्राप्त झाला आहे. आदिवासी समाजाचा पेहरावदेखील त्यांच्या परंपरागत रुढी व्यवस्थेचे ओळखपण सांगणारा आहे.

  जिल्हयातील प्रमुख व्यवसाय शेती असून द्राक्ष, कांदा, डाळिब व उसाचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. जिल्हयात वायनरी उद्योगही मोठया प्रमाणात वाढला असून नाशिकला आता वाईन कॅपिटल ही नवीन ओळख मिळाली आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव येथील कांदयाची बाजारपेठ तर आशिया खंडात प्रसिध्द आहे. जिल्हयात पाच सहकारी साखर कारखाने तर दोन खाजगी साखर कारखाने आहेत. त्याचबरोबर भारत प्रतिभूती मुद्रणालय (इंडिया सिक्युरिटी प्रेस), करन्सी नोट प्रेस, ओझरे येथील विमान निर्मिती कारखान, एकलहरे येथील औष्णिक विज निर्मिती केंद्र, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यामुळेही नाशिक जिल्हयाला विशेष महत्व आहे.

  स्थान व नैसर्गीक वैशिष्टये

  नाशिक जिल्हा १९.३३ ते २०.५३ या उत्तर अक्षाअंशावर व ७३.१६ व ७५.१६ पूर्व रेखांश या भौगोलिक पटृयामध्ये वसला आहे. महाराष्ट्रातील पाच जिल्हे व गुजरात राज्यातील दोन जिल्हये यामध्ये जिल्हयाच्या उत्तर सिमेवर धुळे जिल्हा व ठाणे जिल्हा असून दांग व सुरत हे गुजरात राज्यातील जिल्हे वायव्य दिशेस आहे. जिल्हयाची सरासरी उत्तर दक्षिण लांबी १२० कि.मी. असून पूर्व पश्चिम लांबी २०० कि.मी. आहे.

  क्षेत्र व व्यवस्थापकीय विभाग

  जिल्हयाचे एकूण क्षेत्र १५,५३० चौ.कि.मी. असून क्षेत्राच्या तुलनेत नाशिक जिल्हा महाराष्ट्रत तिस-या क्रमांकावर आहे. हे क्षेत्र राज्य क्षेत्राच्या ५.०४ टक्के आहे. या जिल्हयामध्ये नाशिक, पेठ,दिडोरी, सुरगाणा, कळवण, बागलाण, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, इगतपूरी व नव्याने घोषित केलेले देवळा व त्रंबक असे एकूण १५ तालुके आहेत. जिल्हयात ४ महसूल उपविभाग आहेत त्या पैकी नाशिक या उपविभागात चार तालुके नाशिक, पेठ, इगतपूरी, त्रंबक, दिडोरी तसेच कळवण उपविभागात कळवण, सुरगाणा, बागलाण व देवळा या तालुक्यांचा समावेश आहे. निफाड उपविभाग निफाड, येवला व सिन्नर या तालुक्यांचा समावेश आहे. मालेगांव उपविभागात मालेगाव, चांडवड व नांदगाव या तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हयाचे मुख्यालय नाशिक येथे असून, नाशिकलाच महसूल विभागाचे मुख्यालय १९८२ पासून कार्यान्वित आहे.राज्याचे मुंबई व राजधानीच्या शहरा पासून नाशिक १८८ कि.मी. अंतरावर आहे. जिल्यात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या संदर्भात निरनिराळया तालुक्यांना व्यापलेल्या क्षेत्रांचा विचार केला असता १२% क्षेत्र असलेला मालेगाव तालुका सर्वात मोठा तर पेठ तालुक्याचे सर्वात कमी ३.६३% क्षेत्र आहे. देवळा हा दुसरा क्रमांकाचा लहान (३.८१% क्षेत्र ) तालुका आहेत. राहिलेल्या १२ तालुक्यानी प्रत्येकी जवळजवळ ५% ते ९% क्षेत्र व्यापलेले आहे.

  जिल्हयामध्ये २००१ च्या जनगणनूसार एकूण १९३१ खेडी असून त्यापैकी १,९२७ खेडी, वस्ती असलेली व चार खेडी ओसाड आहेत. इतर जिल्हयाच्या तुलनेत ओसाड खेडयांची संख्या नगण्य आहे.

  जिल्हयात दोन महापालिका, आठ नगर परिषदा व एक कटक मंडळ आहे. मनमाड ’ब ’वर्ग नगर परिषद व बाकी ’क’ वर्ग नगर परिषदा आहेत. जिल्हयात एकूण १,३७२ ग्रामपंचायती आहेत.

  भौगोलिक वैशिष्टये

  जिल्हयाचा काही भाग गिरणा तर काही भाग गोदावरी नदीच्या खो-यात आहे. नांदगाव, कळवण, बागलाण या तालुक्यांचा उत्तर व ईशान्य भाग गिरण्या व तिच्या उपनद्यांच्या खो-यांमध्ये आहे. नाशिक निफाड हे तहसिल गोदावरी परिसरात वसलेले आहे. जिल्हयाचा उर्वरित भाग वैतरणा व दारणा नद्यांच्या खो-यात आहे.

  उत्तर व दक्षिण पसरलेल्या सहयाद्री पर्वतांच्या रांगांनी जिल्हयाचा पश्चिम भाग व्यावला असून, इगतपूरी, पेठ, सुरगाणा हे तालुके पूर्णतः आणि कळवण, नाशिक व बागलाण या तालुक्यांचा पश्चिम भाग यात समाविष्ट आहे. सहयाद्री पर्वताच्या पूर्वेकडे सेलवारी या टेकडीने नाशिक व धुळे जिल्हयाची सरहद्ध निश्चित केली आहे.

  गोदावरी व गिरणा या नाशिक जिल्हयाच्या मुख्य दोन नद्या असून, या व्यतिरीक्त वैतरणा, मोसम, दारणा, मन्याड आणि कादवा या महत्वाच्या नद्या आहेत. जिल्हयात गोदावरी व गिरणा या नद्या बारमाही वाहतात. या नद्यांमुळे त्यांच्या खो-यातील प्रदेश अत्यंत सुपिक झाला आहे.

  हवामान

  जिल्हयात मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळयात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सीअसपर्यंत असते.जून महिन्याचे मध्यापासून पावसास सुरवात होउन ऑक्टोबरच्या मध्यात पावसाळा संपतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रवारी या काळात थंडी असते. २००० या वर्षात कमाल तापमान ४१.९ सेल्सीअस तर किमान तापमान ८.०७ सेल्सीअस होते. यावरून जिल्हयाचे हवामान विषम आहे हे स्पष्ट होते.

  पाउस

  जिल्हयात सर्व भागात सारखा पाउस पडत नाही. पश्चिम भागातील इगतपुरी, सुरगाणा व पेठ तालुक्यात २००० मि.मि.इतका भरपूर पाउस पडतो. मात्र पूर्वेकडे प्रमाण एकदम कमी होते. २००३-२००४ मध्ये जिल्हयात सरासरी १००४.९ मि.मि.पावसाची नोंद झाली.

  मातीचा प्रकार

  जिल्हयातील जमिन विभिन्न प्रकारची असून, ती विविध स्थानिक नावांनी ओळखली जाते. तथापी जमिनीच्या प्रकाराची पुढील प्रमुख गटात विभागणी करता येते. १) काळी, २) तांबडी (माळ), ३) तांबडी/ काळी

  ग्रामीण आणि नागरी लोकसंख्येचे प्रमाण

  जिल्हयाच्या एकूण २००१ च्या लोकसंख्येपैकी ६१.१७% लोक खेडयात राहतात. तर १९.३७ लक्ष नागरी लोकसंख्येपैकी सर्वाधिक ५९.४८ % लोक नाशिक या प्रथम क्रमांकाच्या मोठया शहरात राहतात. २३.५३ % लोक मालेगाव व दुस-या क्रमांकाच्या शहरात राहतात.

  लोकसंख्या

  नुकत्याच झालेल्या सन २००१ च्या जनगणनेनुसार जिल्हयाची एकूण लोकसंख्या ४९,८७,९२३ असून , २५,९१,९८० पुरूष व २३,९५,९३४ स्त्रिया आहेत. १९९१ ते २००१ या १० वर्षाच्या कालावधीत जिल्हयातील लोकसंख्या वाढीचा दर २९.५१ % होता. हा राज्याच्या वाढीच्या दरापेक्षा ६,९५ % आधिक आहे.

  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती

  १९९१ च्या जनगणनेनुसार जिल्हयात ८.४९% लोक अनुसूचित जातीचे व २४.१८% लोक अनुसूचित जमातीचे होते. अनुसूचित जाती व जमातींमध्ये नवबौध्दांचा समावेश नाही. महाराष्ट% राज्यासाठी हे प्रमाण अनुक्रमे ७.१३% व ९.१९ % होते.

  साक्षरता

  १९९१ च्या जनगणनेनुसार जिल्हयातील एकूण लोकसंख्येच्या ६५.३३% लोक साक्षर होते. राज्यात हे प्रमाण ५५.५२% होते. ग्रामीण भागात ५३.२८% तर नागरी भागात ७८.३९% लोक साक्षर होते. पुरूष व स्त्रिया यांच्या साक्षरतेची अनुक्रमे ७३.९८ व ४९.८९% होती.

  जलसिंचन

  २०००--२००१ मधील ओलिताखालील निव्वळ क्षेत्र १,७०,७६९ हेक्टर होते. हे एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या १७% आहे. एकूण सिंचनाच्या साधनापैकी ९२ % सिंचन विहीरीपासून झाले असून उर्वरित ६ टक्के सिंचन पृष्ठभागीय सिंचनाद्वारे झालेले आहे.

  ओलिताचे क्षेत्र

  जिल्हयात १३ मोठे प्रकल्प गंगापूर, गिरणा,चणकापूर, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पालखेड, दारणा, पुनेगाव, तिसगाव, पुनद, दरसवाडी व कडवा धरणे असून गौतमी गोदावरी, भोजापूर, मौसम, हरणबारी, केळझर, आळंदी, कश्यपी व नाग्यासाक्या हे ८ मध्यम पकल्प आहेत.

  पशुसंवर्धन पशुवैद्यकीय सेवा आणि दुग्धोत्पादन

  १९९७ मध्ये घेण्यात आलेल्या पशुगणनेनुसार जिल्हयातील सर्व प्रकारच्या जनावरांची संख्या २५.९५ टक्के लक्ष होती. तर १९९२ पशुगणनेनुसार २३.३५ लक्ष होती. एकूण पशुधनापैकी गायी व बैल यांचे प्रमाण ३८.९९ टक्के होते. तर म्हशी व रेडे यांचे प्रमाण १०.०९ टक्के होते. शेळया व मेंढया यांचे प्रमाण ४२.९६ होते. जिल्हयात एकूण दोन शासकीय दूध योजना नाशिक येथे असून जिल्हयात एकूण ४ दूध प्रकल्प आहेत.

  मार्ग व परिवहन व दळणवळण

  बांधकाम (इवद) विभाग क्र.१,२ व ३ (एकत्रित) जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत १५ उपविभाग येतात. हया विभागाच्या कार्यक्षेत्रात विविध दर्जाचे एकूण ९५७०.६५५ कि.मी.लांबीचे रस्ते अहवाल वर्षात आहेत.

  पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

  सन २००१--२००२ या कालावधीत जिल्हयातील एकूण १९३१ गावांपैकी जवळजवळ ६६ % गावांना बारमाही पुरेसे पाणी उपलब्ध होते. तर राहिलेल्या ६५६ गावांना आणि ४६० वाडयांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

  एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रम

  १९९१ च्य जनगणनेनुसार जिल्हयाच्या एकूण लोकसंख्येपैकी २४.१८% लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे. यात नाशिक, पेठ, दिडोरी, इगतपुरी, कळवण, सुरगाणा,बागलाण या तालुक्यांचा समावेश आहे. समाजाच्या तुलनेत आदिवासी समाज मागाासलेला असल्यामुळे त्यांच्या उत्कर्षाकरिता एकात्मिक आदिवासी विकास कार्यकमांतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. प्रस्तुत माहिती जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन नाशिक जिल्हा २००१-२००२ तसेच जि.प. चे विविध विभागाचे अहवालाचे आधारे घेण्यात आली आहे.

  ग्रामपंचायत विभाग

  २००३--२००४ मध्ये एकूण १३७३ ग्रामपंचायती होत्या. सन २००३--२००४ ची एकूण करमागणी २०,६७,१४,३५५ व मार्च २००४ अखेर वसूली २०,६३,१६,४९३ असून वसूलीचे प्रमाण ९९.८० % आहे. अशाप्रकारे सर्वांगीण वरदान लाभलेल्या, पौराणिक, ऐतिहासिक, औद्योगिक व शेतीप्रधान संपन्न असा नाशिक जिल्हा आहे.

  महाराष्ट्र जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अअधिनियम १९६१ चे कलम १४२ (४) व कलम २७४ (२) व जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल, प्रसिध्द करणे), अधिनियम १९६४ व सुधारणा नियम १९६६ व १९८१ मधील केलेल्या तरतुदीनुसार नाशिक जिल्हा परिषदेचा सन २००३--२००४ चा वार्षिक प्रशासन अहवाल तयार केलेला आहे.

  अहवाल दोन भागात असून पहिल्या भागात जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांनी केलेल्या कामांचा अहवाल दिलेला आहे. दुस-या भागात पंचायत समित्यांचा वार्षिक प्रशासन अहवालाचा समावेश करण्यात आलेला आहे.